औरंगाबाद:पालकमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जिल्हा परिषदेत दुष्काळ आढावा बैठकीत सुचवलेल्या उपाय योजनांबाबत जि.प. अधिकार्यांनी पुढे नेमके काय करायचे या संबंधी चित्र स्पष्ट नसल्याने झालेली बैठक वांझोटी ठरली याचे उत्तर कोणाकडेही नाही.
पाणी टँकरच्या फेर्या वाढवा, रोजगार हमी योजनेच्या कामात वाढ करा, चारा छावण्या मागण्यांची तात्काळ दखल घ्या व त्यावर लगोलग अंमलबजावणी करा, पिकविम्याची रक्कम तात्काळ अदा करा असे आदेश पालकमंत्र्यांनी टंचाई आढावा बैठकीत दिले. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, संदीपान भुमरे, प्रशांत बंब, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. वैजापूर, कन्नड, फुलंब्री, औरंगाबाद मध्यचे आमदार अनुपस्थित होते. त्यांच्या तालुक्यात दुष्काळ नाही का असा प्रश्न या बैठकीत उपस्थित झाला.
दुष्काळावर काटेकोरपणे उपाययोजना करा, शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले खरे परंतु रोजगार हमी योजनेवरील मजुरांना गेल्या तीन महिन्यांपासून रोजंदारी मिळालेली नाही. शिवाय ज्या लोकांनी काम देण्याची मागणी केली आहे, त्यांना काम मिळालेले नाही, अशी अवस्था असताना दुष्काळावर मात कशी करायची असा प्रश्न आमदार अब्दुल सत्तार यांनी या बैठकीत उपस्थित केल्यामुळे बैठकीत उपस्थित केलेल्या प्रश्न व उत्तरांना फार काही महत्त्व प्राप्त झाले असे काही वाटले नाही, असा कर्त काढण्यात आला.
आमदारांना गांभीर्य नाही
जिल्ह्यात 9 आमदार निवडून आलेले आहेत. याशिवाय औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य मतदार संघातून सुभाष झांबड, शिक्षक मतदार संघातून आ. विक्रम काळे व पदवीधर मतदार संघातून आ. सतीश चव्हाण असे बारा आमदार आहेत. पण या बैठकीला फक्त पाच आमदार उपस्थित होते. या बैठकीला वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगाकर, फुलंब्रीचे आमदार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कन्नडचे आमदारपद सध्या हर्षवर्धन जाधव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त आहे, विक्रम काळे, सुभाष झांबड व सतीश चव्हाण गैरहजर होते. एरव्ही जनता आणि शेतकर्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे हे आमदार का गैरहजर राहिले याची उत्तरे तेच देऊ शकतील पण दुष्काळी परिस्थिती असताना जनतेच्या प्रश्नासाठीचे गांभीर्य लोकप्रतिनिधींना किती आहे हे यावरून दिसून येते.